" तू तू मै मै "

" तू तू मै मै "

अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्तेनंतर समाज ढवळून निघाला. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या समर्थकांनी लागलीच कुठलाही पुरावा हाती नसताना हिंदुत्ववादी संघटनांवर खापर फोडायला चालू केले. थोड्या संयमाने वातावरण शांत झाल्यावर या हिंदुत्वादी संघटनाही आपल्या बचावासाठी आक्रमक झाल्या. आणि मग सुरु झाली " तू तू मै मै ". कुणी हिंदुत्वादी कसे हिंसक आहे हे पटवून देण्यात व्यस्त तर कुणी कम्युनिस्टवादी, लेनीन, मार्क्स यांच्या इतिहासातील आणि वर्तमानातील हिंसेच्या कहाण्या उगाळण्यात व्यस्त. आणि मग सुरु झाला ' पुरोगामी ' या शब्दाचा उजळणी वर्ग. 
पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपण जेव्हा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेहमीच " मी चोर आहे हे मान्य … पण तू ही चोरच आहेस" अश्या भावनेतून नक्की काय घ्यावे. एकाचं पितळ उघडं पडलं की तो दुसऱ्याच पण धोतर कसं सुटलेलं आहे हे सांगण्यात बौद्धिक पातळीचा कळस गाठणार… पण मग या साऱ्या चिखलफेकीत 'सत्याची' होणारी निघ्रून हत्या मात्र कुणाला दिसत नाही याचे वाईट वाटते. हा ही हिंसक , तो ही हिंसक … पण मग साऱ्यांनी हिंसा करायची आणि सामान्यांनी नेहमीच मरत राहायचं … हीच का न्यायाची व्याख्या ? सर्वच धर्मोपदेशक किंवा 'वादी' वाले आपण कसे वैश्विक कल्याणाचा विचार करतो याचे पुरावे देण्यात पटाईत. पण आचरणाचे काय ? तुम्ही आम्हाला किती दिवस फसवत राहणार ? आणि आम्ही तरी किती दिवस फसायचे? माझ्या मते या समाजाच्या सार्वभौम कल्याणाचा विचार करणारी परिपक्व प्रणाली आजतरी अस्तित्वात नाही. लेनिनवादी, साम्यवादी, पुरोगामी, समाजवादी, मार्क्सवादी, हिदुत्ववादी, इस्लामिक … आणि अश्या कितीतरी ' वादींच्या' वादात न पडता यापलीकडे जाऊन या मानवजातीस 'पसायदान' देणारा विचारच आणि तसा ' आचारच' तारू शकेल असे वाटते.
                                                                                                                 -sandip aghav

Comments

Popular Posts